जळगाव | प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (शिंदे गट) पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी १९ प्रभागांतून ७५ नगरसेवक निवडले जाणार असून, निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे ज्येष्ठ शिवसेना नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या तब्बल चार तास चाललेल्या ‘मॅरेथॉन मुलाखती’ आज पार पडल्या. या मुलाखतींना आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
मुलाखतीपूर्वी ‘धर्मवीर आनंद दिघे नगरी सहाय्यता कक्ष’ अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते विजयापर्यंतची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, प्रभागनिहाय प्रचाराची रणनीती, तसेच शासनाच्या योजनांचा प्रभावी प्रचार करून मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्रभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेत जुने नगरसेवक, अनुभवी कार्यकर्ते यांच्यासह तरुण, उद्योजक, महिला, तसेच उच्चशिक्षित डॉक्टर, अभियंते आणि वकील यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. दरम्यान, मुलाखत देण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी सुमारे ३०० इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, सर्व उमेदवारांच्या सखोल मुलाखती घेण्यात आल्या. एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुकांनी सहभाग नोंदवल्याने जळगाव महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचा मजबूत संघटनात्मक पाया आणि वाढता जनाधार स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे.
या वेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडी संपर्कप्रमुख सरीताताई कोल्हे-माळी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोकटा, महानगरप्रमुख संतोष पाटील, शहरप्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्याम कोगटा, युवासेना विस्तारक किशोर भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाने रणशिंग फुंकल्याने येत्या दिवसांत जळगावचे राजकारण अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.















