बोदवड (प्रतिनिधी) नगर पंचायत हद्दीतील असंख्य अडचणी व अत्यावश्यक गरजांची पुर्तता करण्यासाठी वेळोवेळी नगर पंचायतला पत्र व्यवहार करून देखील त्याला नगर पंचायत प्रतिसाद देत नसल्याचा दावा करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नगरपंचायत प्रशासनाने एक महिन्यात मागण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
बोदवड शहरातील अत्यावश्यक गरजा त्वरीत पुर्ण नाही केल्यास नगर पंचायत कार्यप्रणालीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. तर आमदार पाटील यांचे मध्यस्थीने कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. मागील दोन वर्षांपासून विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे कार्यकर्त्यांकडून पाठपुरावा सुरु होता. त्यात जामठी रोड येथील स्मशान भुमीचा विकास आराखड्यात घेवुन विकास करणे, बोदवड शहरात एकही मुतारी नाही, ज्या पुरुष मुताऱ्या आहे त्यासुद्धा खराब अवस्थेत आहे, शहरामध्ये किमान महीलांसाठी ३ व पुरुषांसाठी ५ मुतारी त्वरीत बांधणे बाबत, नगर पंचायत हद्दीतील येणाऱ्या सर्व शाळा व अंगणवाडी आहे जिथे पक्का रस्ता नाही तिथे पक्का रस्ता बांधणे, विकास आराखडयात समावेश करून त्वरीत प्राधान्य देण्यात यावे, जामनेर रोड ते आठवडे बाजार ते जामठी रस्ता करणे व नाल्यावरती मोठी मोरी, पुल बांधणे, अग्निशमन गाडी तरतूद करणे, प्नभाग क्र, ८,१६,१७ मध्ये मुख्य पाईप लाईन हि ६ इंची टाकण्याकामी पाठपुरावा असतांना अपुर्ण पाईप का टाकण्यात आलेला आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगर पंचायत बोदवड पर्यंत रस्ता खराब झालेला असुन त्याला नव्याने बांधण्यात यावे किंवा त्वरीत दुरस्ती करावी, शहरात असलेल्या हिरव्या तलावात जंगली वेलीचे निर्मुलन करावे, अश्या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू होता. याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही नसल्याचे सांगत शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी काल १२ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला होता.
उपोषणाला तालुका संघटक शांताराम कोळी, युवा शहरप्रमुख हर्षल बडगुजर, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा उपप्रमुख कलीम शेख, शहर संघटक भास्कर गुरचळ, शहरविभाग प्रमुख गोपाळ पाटील, अल्पसंख्याक तालुका प्रमुख अयुब कुरेशी, नईम खान हे उपोषणाला बसले होते. त्यांचे समर्थनास तालुका प्रमुख गजानन खोडके, शहर प्रमुख संजय महाजन, आतिष सारवान यांनी उपस्थिती दिली. यावेळी नगरसेवक सुनील बोरसे, भारतीय बौद्ध महासंघ तालुका अध्यक्ष अशोक तायडे, सामाजिक कार्यकर्ते आंनदा पाटील, इरफान शेख, सुनील भोई, समशेर शेख, सचिन भोई, अफजल मिस्त्री, रवींद्र माळी, लक्ष्मण सांदे, शेख शकील पटवे, गजानन पालवे, धनराज माळी यावेळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
उपोषण स्थळी काल दुपारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले हे शासकीय कामी नाशिकला गेलेले असल्याने नगराध्यक्षा मुमताजबी बागवान यांचेशी चर्चा केली तसेच उपोषणकर्त्यांशी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचेशी बोलणे करून दिले. आमदार व पालकमंत्री यांना नगरपंचायत प्रशासनाने एक महिन्याच्या आत सर्व विषयांवर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित तहसीलदार प्रथमेश घोलप यांनी सुद्धा नगरपंचायतने तात्काळ कामाबाबत निर्णय घेऊन समस्यानिवारणास सुरूवात करावे असे सांगून याबाबत नगरपंचायतीस लेखी सूचना दिली. त्यानंतर उपोषणर्त्यांनी मान्यवरांचे हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेतले.