नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात भीतीचं सावट निर्माण केलेला कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन भारतातही दाखल झाला असून कर्नाटकात दोन रुग्ण आढळले आहेत. यामधील एक रुग्ण दुबईला निघून गेल्याची धक्कादायक माहिती माहिती समोर आली आहे.
एक जण ६६ वर्षीय असून दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले. त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगितले. पण जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येण्याआधीच खासगी प्रयोगशाळेकडून निगेटिव्ह कोरोना अहवाल घेऊन आठवडाभरापूर्वी ते दुबईला गेले. दक्षिण आफ्रिकेत पाचपट वेगानं पसरणारा ओमायक्रॉन व्हेरियंट भारतात धडकला आहे. त्यामुळेच देशातली आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. गेल्या महिनाभरात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व प्रवाशांचं ट्रेसिंग केलं जात आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरियंटबाबत समजल्यानंतर कर्नाटक सरकारनं दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ९३ जणांना ट्रॅक केलं. यात दोन जण पॉझिटिव्ह आढळले. ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आले आणि त्यात दोन्ही रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आले.
ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याचं कळताच केंद्रानं परदेशातून येणाऱ्यांसाठी नियम अधिक कडक केले भारतात आल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करुन सक्तीचं विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात रुग्ण सापडल्यानं आता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे.