जळगाव (प्रतिनिधी) भारतात ट्रीपल तलाकवर बंदी असतानाही धुळ्यातील एकाने जळगाव येथे राहणाऱ्या आपल्या पत्नीस ‘तलाक तलाक तलाक’ असा मजकुर रजिस्टर पोस्टाने पाठवून घटस्फोट देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जळगाव जिल्हापेठ पोलिसात सासरकडच्या मंडळीविरुद्ध विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Triple Talaq Case In Jalgaon)
जळगाव शहरात राहणारी 35 वर्षीय विवाहितेने जिल्हापेठ पोलिसात सासरच्यांनी मंडळीने छळ केल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार 2019 मध्ये तीचे लग्न धुळ्यातील तरुणाशी झाले. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या लोकांनी विवाहितेस छळण्यास सुरूवात केली. भंगारच्या व्यवसाय वाढवण्यासाठी पत्नीकडे दहा लाख रुपये मागितले. माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर सासरच्या लोकांनी तिला पुन्हा मारहाण केली.
एवढेच नव्हे तर, गर्भवती असताना पतीने पोटात लाथ मारल्यामुळे पिडीत विवाहितेच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला. या घटनेपासून विवाहिता माहेरीच राहत होती. यानंतर तीच्या पतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून ‘तलाक तलाक तलाक’ असे लिहून घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विवाहितेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पतीसह नऊ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार हे तपास करत आहेत.