भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात सुमारे दहा ते बारा वर्षीय मुलाचा नग्न अवस्थेत कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळला होता. त्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालाअंती स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेत गट क्रमांक ३१७/१ मधील दक्षिण बांधालगत दहा ते बारा वर्षीय मुलाचा नग्न अवस्थेत कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळला होता. मृतदेहाशेजारीच गुलाबी व काळ्या रंगाची पानांची डिझाईन असलेला फुल बाहिचा शर्ट तसेच निळ्या रंगाची फुल पॅन्ट आढळली होती. पोलिसांना खुनाची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांनी धाव घेतली होती.
सुरूवातीला या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यात अनोळखीचा गळा आवळल्याचे स्पष्ट झाल्याने तालुका पोलिसात याप्रकरणी हवालदार संजय भोई यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील ठाण्यांमध्ये अपहरण झालेल्या व हरवलेल्या दहा ते बारा वर्षीय वयोगटातील मुलांची माहिती मागितली आहे. त्यावरून मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिक तपास भुसावळ तालुक्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.