नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक नवीन गाव वसवले असून त्यात जवळपास १०० घरे आहेत. धक्कादायक म्हणजे हे गाव सीमारेषेपासून ४.५ किमी आत अंतरावर वसवले आहे. लडाखपाठोपाठ आता अरूणाचल प्रदेशात भारत चीन संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत. अरूणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत चीनने १०० पक्क्या घरांचं खेडं उभारल्याचा दावा भाजप खासदार तापीर गाओ यांनी केला आहे.
चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे भारतासह इतर शेजारी देशही त्रस्त आहेत. लडाखमध्ये भारत-चीनच्या सैन्यात हिंसक संघर्षही झाला. त्यानंतर लडाखमधील तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजूने लष्करी चर्चा सुरू आहेत. तर, दुसऱ्या बाजूला अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने आगळीक केली आहे. चीनने हे गाव सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनाऱ्याजवळ वसवले आहे. एका सॅटेलाइट फोटोमधून याचा खुलासा झाला आहे. या भागावर भारत आणि चीनचा दावा असून दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. हे ठिकाण सशस्त्र संघर्षाचे ठिकाण म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. चीनने अरूणाचल प्रदेशात १०० घरांचे खेडं, एक बाजारपेठ आणि दोन लेनचा पक्का रस्ता भारतीय हद्दीत उभारल्याचा दावा गाओ यांनी केला आहे. या दाव्याची दखल घेत भारतीय परराष्ट्र खात्याने देशाची सार्वभौमता टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असा दावा केला आहे. तर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर तोफ डागली आहे.
सरकार पुन्हा चीनला क्लिनचीट देणार का, असा सवाल चिदंबरम यांनी विचारला आहे. आता केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. अरुणाचल प्रदेशात चीनने नवीन गाव वसवले आहे. राज्यातील अप्पर सबनसिरी जिल्ह्यातील तसरी नदीच्या काठावर हे गाव वसवले आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने केला आहे, तर भारताचा हा भाग आहे. दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की अरुणाचल प्रदेशसह नागरिकांच्या जीवनामध्ये सुधारणा करण्यासाठी रस्ते आणि पुलांसह सीमेच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामांना भारताने वेग दिला आहे.
याआधीदेखील चीनने भूतानच्या हद्दीत एक नवीन गाव वसवले असल्याचे समोर आले होते. चीनकडून सातत्याने आक्रमकपणे विस्तारवादी भूमिका घेतली जात असताना ही आगळीक अतिशय चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लडाखचा वाद अद्यापही शमला नसून चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताच्या हद्दीत काही चिनी सैनिक घुसले होते. त्यांना भारतीय सैन्याने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा चीनकडे सोपवण्यात आले.
















