दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली पोलिसांनी वृद्ध जोडप्याच्या हत्येप्रकरणी त्यांच्या सुनेला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे सुनेने प्रियकरासह सासू आणि सासऱ्यांना संपवण्याचे षड्यंत्र रचून हत्याकांड केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
या संदर्भात अधिक असे की, रविवारी रात्री कुटुंबातील इतर सदस्यांसोबत गप्पा मारल्यावर मृत राधेश्याम आणि त्यांची पत्नी वीणा तळमजल्यावर झोपायला गेले होते. सोमवारी सकाळी राधेश्यामचा मुलगा उठला तेव्हा त्याला आई-वडिलांचे रक्ताने माखलेले मृतदेह पलंगावर पडलेले दिसले. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. तर घराचा मागील दरवाजाही उघडा होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ तपासचक्र फिरवायला सुरुवात केली.
त्यानंतर पोलीस तपासात समोर आले की, घरात बऱ्यापैकी रक्कम ठेवली आहे याची सुनेला माहिती होती. यामुळे प्रियकरासह मिळून तिने सासू आणि सासऱ्याच्या हत्येचे षड्यंत्र रचले. त्यानुसार तिने रविवारी सायंकाळी प्रियकराला घरी बोलावून गच्चीवर लपवून ठेवले. कुटुंबातील सर्वजण झोपी गेल्यानंतर आरोपी सुनेने प्रियकरासोबत मिळून रात्री उशिरा सासू आणि सासऱ्याची हत्या केली. त्यानंतर प्रियकर घरातून दागिने आणि पैसे घेऊन पळून गेला. हत्येचा तपास करत असताना पोलिसांना सुनेवर संशय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सुनेला अटक केली असून, तिचा प्रियकर फरार आहे. दरम्यान, मयत राधेश्याम हे एका सरकारी शाळेतून उपमुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले होते.