वाई (वृत्तसंस्था) एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला (Deadly attack) केल्याची धक्कादायक घटना सातारा (satara) जिल्ह्यातील वाई (Wai) याठिकाणी घडली. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार केले जात आहे. या प्रकरणी वाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.
तन्झीला सिकंदर आतार असं हल्ला झालेल्या 30 वर्षीय फिर्यादी महिलेचं नाव आहे. त्या वाई शहरातील फुलेनगर परिसरातील रहिवासी आहेत. तर पती सिकंदर आमीन आतार (रा. फुलेनगर) व त्याची प्रेयसी संतोषी पिसाळ (रा. व्याजवाडी, ता. वाई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपी सिकंदर आतार हा विवाहित असून मागील काही दिवसांपासून त्याचं आरोपी संतोषीसोबत अनैतिक संबंध सुरू होते. या घटनेची माहिती पत्नी तन्झीला यांना मिळाल्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होतं होते.
अन् प्रेयसीनं केले कोयत्यानं वार
याच वादातून रविवारी 21 फेब्रुवारी रोजी आरोपी पती सिकंदर यानं आपल्या प्रेयसीच्या मदतीनं पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपी सिकंदर यानं भाजी मंडई परिसरात फिर्यादी तन्झीला यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर चित्र टॉकीजच्यासमोर आरोपीनं तन्झीला यांचे हात पकडले. यावेळी संतोषीनं तन्झीला यांच्यावर कोयत्यानं वार केले. या हल्ल्यात तन्झीला गंभीर जखमी झाल्या. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तन्झीला यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
हा जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पीडित पत्नी तन्झीला आतार यांच्या फिर्यादीवरून वाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तर तन्झीला यांच्यावर वाईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.