हैदराबाद (वृत्तसंस्था) हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी पबमध्ये पार्टी करून घरी परतत असताना ही घटना अलिशान कारमध्ये घडली. संशयित आरोपींमध्ये एका आमदाराचा मुलासह एका राजकीय पक्षाचा पदाधिकारीही असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
एका वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत चार आरोपी सामील आहेत. त्यातील एक अल्पवयीन आहे. तसेच एका आमदाराचा मुलगा संशयितांमध्ये असल्याची माहिती आहे. पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना शनिवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला
पीडित मुलगी ज्या पार्टीमध्ये गेली होती, तिथे एका आमदाराच्या मुलासह एका राजकीय पक्षाचा पदाधिकारीही होता. पीडितेने एका आरोपीची ओळख पटवली असून, तो अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी कलम ३५४ आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. १७ वर्षीय पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी त्यानंतर कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांनी तीन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला होता. तक्रारदारांच्या माहितीनुसार, मागील शनिवारी ही घटना घडली होती. पीडितेच्या मानेवर खुणा होत्या. त्यामुळे कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी तिला विचारणा केल्यानंतर, एका पबमध्ये झालेल्या पार्टीमध्ये गेले असता, काही जणांनी तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले, असे तिने सांगितले.
रिपोर्टनुसार, पार्टीतून निघून बाहेर आल्यानंतर पीडिता आरोपींच्या कारमध्ये बसली. त्या अलीशान कारमध्ये तीन ते चार मुले होती. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, कार निर्जन ठिकाणी थांबवण्यात आल्यानंतर कारमधील तरुणांनी तिला आधी मारहाण केली. दरम्यान, मुलीच्या जबाबानुसार, आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पबमधील पार्टीत सहभागी झालेले आणि तिथे काम करणाऱ्या व्यक्तींकडे चौकशी केली जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.