बुलंदशहर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका गतिमंद तरुणानं शेतकऱ्यांवर हल्ला केला. तरुणानं फावड्यानं ५ शेतकऱ्यांवर हल्ले केले. त्यातल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. हल्ले करून आरोपी तिथून फरार झाला. मात्र पोलिसांच्या पथकानं त्याला अटक केली आहे.
खानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माजरा परवाना गावात ही घटना घडली. तरुणाच्या हल्ल्यात एका महिलेचा आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती एसएसपी संतोष कुमार यांनी सांगितलं. या घटनेची चौकशी सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, गतीमंद तरुण पादचाऱ्यांना देखील लक्ष्य करत होता.
घरातून फावडं घेऊन निघाला होता
बलवीर सिंहनं दोघांची हत्या केल्याची माहिती गावात राहत असलेल्या लाल सिंह यांनी दिली. हल्ल्यात सात जण गंभीररित्या जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. आरोपी घरातून फावडं घेऊन निघाला होता, असं पोलीस म्हणाले. तो रस्त्यात दिसेल त्याला मारत सुटला. त्यानं सात जणांना जखमी केलं. त्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. जखमी झालेले लोक वेगवेगळ्या कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हल्ले करून आरोपी फरार मात्र, पोलिसांच्या पथकाने अटक केली
तरुणानं केलेले हल्ले पूर्ववैमनस्यातून झालेले नाहीत. हल्ले करून आरोपी तिथून फरार झाला. मात्र पोलिसांच्या पथकानं त्याला अटक केली. कपड्यांवर असलेल्या रक्ताच्या डागांवरून आरोपीची ओळख पटली. सध्या पोलिसांची अनेक पथकं गावात तैनात आहेत.