भुसावळ (प्रतिनिधी) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आनंद नगर शाखेत पुन्हा गृहकर्ज घोटाळा झाल्याची तक्रार मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी हडपलेल्या १२ लाखाच्या कर्जाची तक्रार दाबण्यासाठी पुन्हा १६ लाखाच्या गृहकर्ज घोटाळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढे सर्व झाल्यानंतरही घर बांधकाम करून न दिल्यामुळे अखेर फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर एका महिलेने तक्रार केली आहे.
आर्थिक फसगत झालेली महिला अफसाना बानो कलीम खान, (रकानगर, भुसावळ ता. भुसावळ जि. जळगाव) यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, आपल्या स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा आनंद नगर, भुसावळ, जि. जळगाव या शाखेतून सन २०१९ मध्ये होमलोन रक्कम रु.१२,००,०००/- रू. बारा लाख मात्रचे मंजूर झाले होते. सदर बँकचे मॅनेजर यांनी मध्यस्थी एजंट नामे महेमुद पठाण, महेंद्र पाटील, रविद्र सपकाळे (सर्व रा. भुसावळ) यांना माझे संमतीविना परस्पर माझी कोणत्याही प्रकारे सही न घेता संगनमताने आपसात वाटून घेतली. त्यानंतर मी सदर बँक मॅनेजर यांना रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी मला उडवा उडवीचे उत्तरे देऊन तेथून हाकलून दिले. तेव्हा मी त्यांना सांगीतले की, मी तुमची तक्रार वरिष्ठांकडे करते तेव्हा ते मला म्हणाले की, तुझ्या कडुन जे होईल ते करून घे.
काही महीन्यानंतर तेथे तत्कालीन मॅनेजर नंदलाल पाटील यांची नियुक्ती झाली. तेव्हा मी सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतू त्यांनी देखील सदर मध्यस्थी यांच्या महसूल सहाय्यक / सोबत संगनमत करून मला खाली प्लॉट आहे का? अशी विचारणा केली. त्यावर मी त्यांना हो असे सांगीतले. तेव्हा त्यांनी माझ्या मालकीचा भुसावळ येथील स.नं. असलेला रिकामा प्लॉटचे संबंधीत कागदपत्रे दिले. संबंधीत मॅनेजर व मध्यस्थी यांनी मला सांगीतले की, आम्ही तुम्हाला या प्लॉटवर १६ लाखाचे हाऊसिंग लोन मंजूर करून देतो. सदरचे प्रकरण मंजुर करून सदर रक्कम ही वरील ठेकेदार म्हणून उभे केलेले मध्यस्थी पैकी मेहमुद पठाणचे भाऊ नामे अजीज पठाण याच्या नावे परस्पर वर्ग केली. मात्र त्याने आजपावेतो मी तारण केलेल्या प्लॉटवर एका विटेचे सुद्धा बांधकाम न करता माझी आर्थिक फसवणुक केलेली आहे.
या बाबत मी सदर मध्यस्थी व ठेकेदार यांस विचारणा केली असता ते मला धमकी देतात की, जर तु यापुढे आमच्याकडे रक्कम मागायला अगर बांधकामाबाबत विचारणा करण्यास आली?, तर तुला आणि तुझ्या पतीला जिवंत ठार मारू. वरील लोकांनी आजपर्यंत अनेक बोगस होमलोन व मॉर्गेज लोन मंजुर करून शासनाची व लोकांची खुप मोठया प्रमाणात आर्थिक फसवणुक केलेली आहे. तरी यामध्ये सहभागी व्हॅल्युअर, सी.ए. सर्व रिपोर्ट देणारे पॅनलचे वकिल हे सर्व दोषी असुन व्हॅल्युअर यांनी जमीनीची बोगसरित्या किंमत वाढवली आहे. तसेच सी.ए. यांनी बोगस आय. टी. रिटर्न बनवले आहेत. त्यामुळे यांच्यासह इतर संबंधीतांची सखोल माहिती घेऊन त्यांची संपत्तीची चौकशी करण्यात यावी.
तसेच या लोकांनी मजीदखान ईद्रीस खान या व्यक्तीच्या नावे कितीतरी बोगस डॉक्युमेन्ट बनवून त्याचे नावे १६ लाखांचे कर्ज मंजूर करून घेत त्यापोटी व्याज म्हणून एक लाख देऊन उर्वरीत संपूर्ण रक्कम त्यांनी आपसात वाटुन घेतलेली आहे. अशा प्रकारे किती तरी बोगस कर्ज प्रकरणे ईद्रीस खान यांचे नावे मंजूर करून आपले घर भरलेले आहेत. या सर्वाची सखोल चौकशी करण्यात येऊन त्यांची संपत्तीची चौकशी करण्यात यावी व त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. जर असे न झाल्यास मी माझे जिवाचे बरेवाईट करून घेईल व त्यास जबाबदार शासन राहील याची नोंद घ्यावी, असा इशारा देखील आर्थिक फसगत झालेल्या महिलेने दिला आहे. या तक्रारी अर्जाच्या प्रती वित्तमंत्री भारत सरकार, राज्यपाल महाराष्ट्र, मुख्यमंत्री, आयजी नाशिक, रिजनल मॅनेजर एसबीआय, जळगाव यांच्यासह इतरांना पाठवण्यात आली आहे.