जयपूर (वृत्तसंस्था) पतीने दुसऱ्या पत्नीचा ओढणीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना राजस्थानची राजधानी जयपूरमधील प्रताप नगर पोलीस ठाणे परिसरात घडली. पाच वर्षांपूर्वी या दोघांनी प्रेमविवाह (love marriage) केला होता.
प्रताप नगर ठाणेप्रभारी बलबीर कासवान यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी सलमान त्याची दुसरी पत्नी रवीनाला भेटण्यासाठी घरी पोहोचला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यावर सलमानने रवीनाचा तिच्याच ओढणीने गळा दाबून खून केला. यानंतर त्यांनी दीड वर्षाच्या रुहानला घेऊन पोलीस ठाणे गाठले. तेथे त्याने पत्नीची हत्या झाल्याचे सांगितले आणि हत्येचा आरोप मेहुणी आणि पत्नीच्या मावशीच्या पतीवर लावले. सलमानच्या तक्रारीनंतर प्रतापनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिथे त्यांना काही खुणाही आढळल्या. यासोबतच फॉरेन्सिकच्या टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांना सलमानच्या मेहुणी सीकरमध्ये असल्याचे कळाले. तसेच त्याचा मावस सासराही तिथेच मिळाला. एकूण घटनाक्रम पाहिल्यानंतर संशयाची सुई सलमानकडे वळाली.
खोटे बोलला अन् सापडला
याचदरम्यान, रवीनाची आई आणि अन्य नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, सलमान आणि रवीनामध्ये वाद होते आणि याचमुळे ते वेगळे राहत असल्याचे समोर आले. याचवेळी रवीनाच्या नातेवाईकांनी सलमानवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी सलमानची चौकशी केली असता तो वारंवार आपला जबाब बदलू लागला. अशा स्थितीत त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पाच वर्षांपूर्वी सलमानने त्याची गर्लफ्रेंड रवीना बानोसोबत दुसरे लग्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. लग्नानंतर सलमानसोबत विभक्त झाल्याने रवीना तिची आई बबली आणि बहीण आलियासोबत प्रताप नगरमध्ये राहत होती. त्याचवेळी सलमान त्याच्या पहिल्या पत्नीसोबत सांगानेर येथे राहतो. पोलिसांनी निरागस बालक रुहानला त्याच्या आजीच्या ताब्यात दिले आहे.