परभणी (वृत्तसंस्था) परभणी येथे विवाहासाठी येत असलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या वाहनावर ८ मे रोजी अज्ञात तीन हल्लेखोरांनी हल्ला केला. यात नवरदेव पंकज कदम जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कदम हे इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
पंकज कदम हे यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा (ता. मरखेड) येथील रहिवाशी आहेत. ते श्रीहरी कोट्टा येथे कार्यरत आहेत. त्यांचा विवाह परभणीतील एका मुलीसोबत ठरला आहे. ९ मे रोजी वरद गार्डन मंगल कार्यालयात त्यांचे लग्न होणार होते. ८ मे रोजी नवरदेव पंकज कदम व त्याचे कुटुंबीय हळदीला येत होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन राहटी नदीवरील पुलावर ३ दुचाकींवर आलेल्या ६ जणांनी पंकज यांचे वाहन थांबवले. त्यानंतर थेट पंकज यांच्यावर रॉडने हल्ला चढवीत जबर मारहाण केली आणि काही मिनिटातच हल्लेखोर दुचाकीवर बसून पसार झाले.
पंकज यांच्या हात, पाय, पाठीवर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी परभणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान चार ते पाच दिवसांपूर्वी पंकज कदम यांच्यावर नांदेड येथील रेल्वे स्टेशनजवळ हल्ला झाल्याची देखील समोर येत आहे. परभणी येथील हल्ल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवून कोणी तरी हल्ला घडविल्याचा संशय पोलिसांना आहे.