वरणगाव (प्रतिनिधी) एका ३५ वर्षीय विवाहितेचा तीन महिन्यापासून पाठलाग करून करून मोबाईलमध्ये फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी विकृताला चांगलाच चोप दिला. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी चेतन गणेश तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, चेतन तायडे हा सुमारे ३ महिन्यापासून पिडीत विवाहितेचा नेहमी पाठलाग करून घरासमोर बसून एक टक पाहत असायचा. विकृताची हिंमत एवढी वाढली की, दि. २९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिडीत महिला पोर्चमध्ये घरकाम करीत असताना चेतन तायडे याने त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढले. पिडीत महिलेने आपल्या पतीला संबंधित तरुणाच्या विकृत वर्तनाची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा आल्यानंतर विवाहीतेने त्याला ओळखले. परिसरातील नागरिकांनी चेतनला पकडत चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि संशयित तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात चेतन गणेश तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि आशिष आढसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकां मुकेश जाधव हे करीत आहेत.