अकोला (वृत्तसंस्था) अवघ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत नराधम बापाने बळजबरी करून शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान, मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांनी आरोपी पित्याला जन्मठेपेसह दोन लाख ७५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
माना पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील आरोपी वडिलांची स्वत:च्याच मुलीवर वाईट नजर पडली आणि आरोपीने अवघ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करून शरीरसंबंध प्रस्थापित केले. २०१७ ते २०१९ दरम्यान नराधम आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. मुलीच्या तक्रारीनुसार वडिलांविरुद्ध माना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी वडिलांविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल केलं होतं. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात याबाबतचा संपूर्ण खटला चालला.
न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली
यावेळी न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 8 साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी वडिलांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. भादंवि कलम 376(2) (F) (1)(N) व पॉक्सो कायदा कलम 5-6 मध्ये दोषी ठरवून न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली व कलम 376 (3) मध्ये 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व विविध कलमांतर्गत 2 लाख 75 हजार रुपये दंड सुनावला. तसेच दंड न भरल्यास प्रत्येक कलमानुसार सहा महिन्यांची शिक्षाही सुनावली आहे.
पीडित मुलीच्या आईने ऐनवेळी जबाब बदलला
या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने जबाब ऐनवेळी बदलला होता तरीही पीडितेची साक्ष, इतर साक्षीपुराव्याच्या आधारावर आरोपीस सदर कृत्याबद्दल दोषी धरण्यात येऊन शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय खंडारे यांनी केला होता. तसेच सहायक सरकारी अभियोक्ता मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली. पोलीस कर्मचारी विजय विल्हेकर व सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून बाजू मांडली.
अशी उघडकीस आली घटना
गुड टच, बॅड टच’ बाबत मार्गदर्शन करताना पीडित मुलीने वडीलच तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याची बाब पोलिसांना सांगितली. तसेच तिने ही बाब तिच्या मैत्रिणीलाही सांगितली होती. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा रीतसर जबाब नोंदवून वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.