भंडारा (वृत्तसंस्था) आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या अल्पवयीन नातीवर आजोबांसह दोन आरोपींनीही अत्याचार केल्याने सामोर आले असून आता आरोपी आजोबासह अन्य दोन आरोपींवर लाखनी पोलिसांनी अत्याचारासह पोक्सो कायदानुसार गुन्हा नोंद करत अटक केली आहे.
विलास देवराम तुमसरे वय ५६ वर्ष, यशवंत तातोबा कमाने वय ६७ वर्ष दोन्ही रा. गडेगाव ता. लाखनी, अनिल रमेश सेलोकर वय २५ वर्ष रा. रोहणा ता. मोहाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पीडिता ही १३ वर्षांची असून पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला असून ती आई आणि आजोबासह राहते. तिच्यावर २०१९ पासून हा अत्याचार होत होता. ११ वर्षाची असताना तिला पहिल्यांदा लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागला. २०१९ मध्ये पीडिता ही एकटीच शेतात गेली असताना तिथे कोणीच नसल्याची संधी साधून आरोपी विलास तुमसरे याने तिला बळजबरीने शेतातील झोपडीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर, घटनेबाबत वाच्यता केल्यास भावाला आणि आईला मारून टाकेल अशी धमकी दिली. पीडितेने घटनेची माहिती कुणालाही दिली नाही. त्यामुळे आरोपीची हिम्मत वाढल्याने त्याने चिमुकलीवर आणखी तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान सख्ख्या आजोबानेही नातीवर वाईट दृष्टी नजर ठेवून तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. असाच प्रकार नात्यात काका लागणाऱ्या अनिलनेही केला आहे.
मागील तीन वर्षांपासून वारंवार होणारा अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने स्वतः पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर हा किळसवाणा आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेच्या तक्रारीवरुन आजोबांसह तिघांविरुद्ध विनयभंग, अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.