सांगली (वृत्तसंस्था) मास्क लावण्याची मुळीच गरज नाही, हा सगळा मूर्खपणा आहे, कोणत्याही शहाण्याने हा सिद्धांत काढला असे वादग्रस्त वक्तव्य करत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटलं की कोरोनामुळे मेलेली माणसं जगण्याच्या लायक नव्हती. यावेळी त्यांनी कोरोना निर्बंधावरुनही टीका केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
“मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही”.
“कोरोनाच्या नावाखाली खेळखंडोबा सुरु आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार जबाबदार आहे. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का?,” अशी विचारणा संभाजी भिडे यांनी केली. “कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील,” असंही ते म्हणाले.
“कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, तो घेईल , सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, व्यसने वाढवायचे गांजा, मटका अफू सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद. करोना अस्तित्वात नाही. लॉकडाउनची गरज नाही. सरकारने काही कारू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे,” असंही ते म्हणाले.
“कोणत्या शहाण्याने जगाच्या पाठीवर मास्क लावण्याचा हा नालायक सिद्धांत काढला आहे. मास्क लावण्याची काही गरज नाही. मास्क नसेल तर पोलीस काठ मारतात. हा सगळा मूर्खपणा आहे”, असंही संभाजी भिडे म्हणाले.