वर्धा (वृत्तसंस्था) तालुक्यातील माटोडा (बेनोडा) येथे पोटच्या मुलानेच वृद्ध अपंग आईचा काठीने अमानुष मारहाण करीत खून केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मृतक महिलेचे कौसल्याबाई तुमसरे (८२) असे तर हेमराज तुमसरे (४२), असे आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, गेल्या तीन ते चार दिवसांपासून आरोपी हेमराज हा घरगुती वाद करत चिडचिड करत होता. त्यामुळे त्याची पत्नी मुलीसह चुलत सासरे यांच्याकडे झोपण्यास गेली होती. त्यामुळे घरी मुलगा हेमराज आणि अपंग आई कौसल्याबाई हे दोघंच घरी होते. रविवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास लाईट गेल्यानंतर तुमसरे कुटुंबीय जागे झाले. याच वेळी त्यांना हेमराज आईला मारहाण करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराचे दार उघडून बघितले असता हा आई कौशल्या हिला काठीने मारहाण करीत होता. दोघांमध्ये शाब्दीक वाद झाल्याने रागाच्या भरात मुलाने लाकडी दांड्याने आईच्या डोक्यावर वार केला. ज्यात दोन्ही पायाने अपंग असलेल्या आईचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी हेमराजला तात्काळ अटक केली. दरम्यान, हेमराज आणि त्याच्या आईमध्ये मध्यरात्री नेमका काय वाद झाला ?, हे मात्र पोलीस तपासातूनच समोर येणार आहे.