भंडारा (वृत्तसंस्था) आपल्या प्रेयसीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना येथील हिरणवार लॉजमध्ये रविवारी (२० ऑगस्ट) घडली. या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. क्रिष्णा धनजोडे (२३, रा. केशोरी, ता. कामठी, जि. नागपूर) असे मृतकाचे नाव आहे.
क्रिष्णाचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. रविवारी (२० ऑगस्ट) दोघेही भेटण्याकरिता भंडारा येथे आले. दिवसभर खरेदी, हॉटेलिंग करून दोघेही हिरणवार लॉज येथे थांबले. रात्री (दि.२१) च्या पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास प्रेयसीला जाग आली असता, कृष्णा बेशुद्धावस्थेत दिसला. तरुणीने क्रिष्णाला उठविण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. तो काहीच हालचाल करीत नसल्याचे लक्षात येताच तरुणीने तातडीने लॉजच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले व त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून क्रिष्णाला मृत घोषित केले.
दरम्यान, लॉजवरील रुममधून कृष्णाच्या खिशातून कामोत्तेजक गोळ्यांचे पाकीट मिळाले. त्यातील १०० एमजीच्या दोन गोळ्या रिकाम्या होत्या. कृष्णाने त्या सेवन केल्याची माहिती प्रेयसीने पोलिसांना दिली. कृष्णाच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसले, तरी या गोळ्यांमुळे रक्तदाब वाढून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रहाटे करीत आहेत. तरुणाचा मृत्यू हा वायग्रा शक्तिवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.