खामगाव (वृत्तसंस्था) एका शिक्षकाने चाकूचा धाक दाखवून सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकांवर गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. सोबत ये-जा करताना झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत शिक्षिकेवर अत्याचार केला.
शहरातील एका कॉलनीत राहणारी ३६ वर्षीय शिक्षिका तालुक्यातील एका गावातील शाळेत कार्यरत आहे. रमाई संकुल समर्थनगर भागातील रहिवासी शिक्षक श्रीकांत गुलाबराव वानखडे (४६) हे हिंगणा-कारेगाव येथील शाळेवर कार्यरत आहेत. शिक्षिकेचे गाव त्याच रोडवर असल्याने ते दोघेही काही शिक्षकांसोबत कारने खामगाववरून ये-जा करत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगली ओळख झाली होती.
दरम्यान, शिक्षक श्रीकांत वानखडे याने शिक्षिकेला घरी बोलाविले. आतील दार लावून घेत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिक्षिकेने नकार देत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता वानखडे याने चाकूचा धाक दाखवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याने शिक्षिकेचे आक्षेपार्ह फोटो काढून हा प्रकार कुणाला सांगितल्यास फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेन, तसेच व्हायरल करेन, अशी धमकी दिली. याबाबत पीडित शिक्षिकेने शहर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन शिक्षक श्रीकांत गुलाबराव वानखडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.