मुंबई (वृत्तसंस्था) बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर अज्ञातांनी पहाटे गोळीबार केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर शिंदेंनी सलमान खानला धीर दिला आहे. घाबरण्याचं काम नाही, तुमच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानला सांगितलं आहे.
सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरातच असल्याचे सांगितले जातंय. गोळीबाराच्या घटनेनंतर सर्व यंत्रणात तपासाला लागल्या आहेत. आरोपींचा कसून शोध हा घेतला जातोय. सलमान खानच्या घराबाहेरील फायरिंगमागे बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सलमान खानच्या घराबाहेर रविवारी सकाळी गोळीबार झाला. हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोई टोळीने केला असावा, असा संशय मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून अनेक पथके तैनात केली आहेत. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावरून विरोधकांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला धारेवर धरले आहे. गोळीबारावर खासदार संजय राऊत ते प्रियंका चतुवेदी आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.