वर्डी (ता. चोपडा) प्रतिनिधी : येथील श्री समर्थ सुकनाथ बाबांची ९० वी पुण्यतिथी (भंडारा) आणि नवचैतन्य महोत्सवाचा कार्यक्रम उद्या, दि. १४ मार्च २०२५ रोजी आयोजित केला जाणार आहे. वर्डी गाव हे सातपुड्याच्या पायथ्याशी असून, येथे श्री सुकनाथ बाबांचे भव्य मंदिर आणि समाधी आहे. या कार्यक्रमासाठी चोपडा तालुका, जिल्हा तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून लाखो भाविक उपस्थित राहून दर्शन घेणार आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेतील.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे:
सकाळी ७:०० वाजता आरती
८:०० वाजता मारोती अभिषेक
९:०० वाजता समाधी अभिषेक
१०:०० वाजता समाधी स्नान
११:०० वाजता होम हवन
दुपारी १२:०० वाजता आरती
दुपारी १:०० ते रात्री ७:०० वाजेपर्यंत महाप्रसाद भोजन
७:०० वाजता आरती
८:०० वाजतापासून पालखी मिरवणूक
रात्री ९:०० वाजता भजन, कीर्तन आणि भारुडाचा कार्यक्रम
श्री समर्थ सुकनाथ बाबांचे जीवन आणि कार्य
समर्थ सुकनाथ बाबांचे वडील सज्जननाथ होते. ते माधुकरी मागून नाथ संप्रदायाचा प्रचार करत होते. लोकांच्या मते, श्री सुकनाथ बाबा हे नर्मदा किनाऱ्यावर पाण्यावर तरंगत मिळाले होते. त्यांचा जन्म रहस्यपूर्ण असून, त्यांचे बालपण चुंचाळे (ता. यावल) येथे गेले. नंतर वर्डी येथे एका छोट्या कुटीयात राहून त्यांनी आपली कर्मभूमी स्थापन केली. लहान वयातच ते गावोगावी फिरून भिक्षा मागत असत आणि त्यांना असलेल्या दैवी शक्तीचे चमत्कार दाखवत असत. गोरगरीबांची आजारातून मुक्तता करणे, संकटांची पूर्वसूचना देणे, पक्ष्यांची बोली भाषा समजणे यासारखे चमत्कार त्यांच्याकडून घडले. सर्व जातीधर्माच्या लोकांना भक्ती मार्गावर आणणारे बाबा त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांचे संसार सुधारले. त्यांनी १९३५ मध्ये जिवंत समाधी घेतली. त्यांच्या पश्चात, त्यांचे पुत्र परमपूज्य रघुनाथ बाबा यांनी नाथ संप्रदायाची भगवी पताका हाती घेतली आणि बाबांचे कार्य पुढे चालवले. रघुनाथ बाबांनी १९७९ मध्ये जिवंत समाधी घेतली. त्यानंतर, जगन्नाथ बाबांनी दरबाराची गादी स्वीकारली आणि हरी नामाचा गजर अखंड चालवला. त्यानंतर, त्यांच्या पुत्र दिनानाथ (भैय्या) महाराज मठाधिपती म्हणून कार्य करत आहेत.
वर्डीकरांचे एकात्मतेचे दर्शन
समर्थ सुकनाथ बाबांच्या पावनभूमीवर भंडारा आणि महाप्रसादासाठी लाखो भाविक येतात. या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीची स्थिती येऊ नये, यासाठी सर्व जातीधर्माचे लोक आपापल्या कर्तव्यात तत्पर आहेत. १५० पोते गव्हाची बट्टी, वरण आणि ६० क्विंटल वांग्याची भाजीच्या महाप्रसादाची तयारी केली जात आहे. गावातील महिलांसह सर्व ग्रामस्थ रात्रंदिवस या आयोजनासाठी एकत्र काम करत आहेत.
पालखी मिरवणुकीसाठी भव्य सजावट केली जात आहे आणि रात्रीचा कार्यक्रम देखील अत्यंत आकर्षक असतो. भंडारा साठी चोपडा, जळगाव, यावल, अडावद येथून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जादा बसेसचा लाभ घेण्यासाठी चोपडा आगार प्रमुख महेंद्र एल. पाटील यांनी आवाहन केले आहे.
संपूर्ण कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. अडावद पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ आणि उपनिरीक्षक राजू थोरात यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाहतूक बंद ठेवून कार्यक्रमाचे सुरळीत आयोजन करण्यात येईल.
संपूर्ण महाराष्ट्राला एकोपाचा संदेश देणारा सोहळा
यावर्षीच्या भंडारा आणि पुण्यतिथी सोहळ्यासाठी तेल, तुरीची दाळ, वांगे, केळीची पाने आणि पाणी पुरवठा करण्यासाठी विविध संस्थांची मदत घेण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, सामाजिक संघटना, तरुण मंडळे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शैक्षणिक संस्था सक्रियपणे योगदान देत आहेत.
मठाधिपती दिनानाथ (भैय्या) महाराज, पोलिस पाटील पद्माकर नाथ आणि ग्रामस्थांनी सर्व भाविकांना पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.