प्रतिनिधी / रावेर
रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतीळ राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवार श्रीराम पाटील आज रावेर तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेण्यासठी सकाळी रावेर येथून निघाले. मतदारांच्या भेटी घेत असतांना अचानक पाऊस सुरु झाला मात्र न थांबता त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. यावेळी सोबत असलेले आमदार शिरीष चौधरी यांनी श्री पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे नागरिकांना आवाहन केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी रावेर तालुक्यातील भोकरी, केऱ्हाळा, अहिरवाडी, करजोद, खानापूर, वाघोड, मोरगाव, खिरवड येथील मतदारांच्या भेटी घेतल्या. सर्वप्रथम भोकरी येथील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी पावसाळा सुरुवात झाली मात्र ग्रामस्थानी उमेदवार श्री पाटील यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होत विजयी करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर केऱ्हाळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराची सुरुवात केली.ढोल ताशांच्या गजरात गावातून रॅली काढण्यात आली. अहिरवाडीत ग्रामस्थांनी उमेदवार श्रीराम पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. या ठिकाणी नागरिकांच्या समस्या एकूण घेत त्या भावी काळात सोडविण्याचे आश्वासन उमेदवार पाटील यांनी दिले.करजोद, खानापूर, वाघोड, मोरगाव, खिरवड येथे ठिकठिकाणी महिलांनी उमेदवार श्रीराम पाटील यांचे औक्षण करीत विजयी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी किसान जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेनेचे (उबाठा गट)प्रल्हाद महाजन, जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील, महेमूद शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वघटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.