नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी देशात लसीकरण अभियानाची सुरुवात झाली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेत दोन दिवसांत दोन लाख २४ हजार ३०१ करोनायोद्धय़ांना लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी ४४७ जणांवर प्रतिकूल परिणाम म्हणजेच लसीचा साइड इफेक्ट झाला आहे. तर तीन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
१६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियानादरम्यान आता काहीशी चिंताजनक माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॅक्सिन घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण ४४७ लोकांवर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाला आहे. यापैकी तीन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोना वॅक्सिन घेतल्यानंतर, काहींना वॅक्सिनचा प्रतिकूल परिणाम दिसला आहे. दिल्लीतील ५२ हेल्थ वर्कर्सला लस दिल्यानंतर समस्यांचा सामना करावा लागला आहे. वॅक्सिन घेतल्यानंतर काही लोकांना ऍलर्जीची समस्या आली आहे. तर काहींना घाबरल्यासारखं होत असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील ५२ हेल्थ वर्कर्सना वॅक्सिन घेतल्यानंतर समस्या आल्या, त्यापैकी एकाला AEFI सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत एकूण २,२४,३०१ लोकांना वॅक्सिन देण्यात आलं आहे. दिल्लीतील आरोग्य मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारीला कोरोना वॅक्सिन दिल्यानंतर ५२ हेल्थ वर्कर्समध्ये किरकोळ समस्या दिसून आल्या, तर एकात गंभीर समस्या दिसल्या. ज्या हेल्थ वर्करला एडमिट करण्यात आलं आहे, त्याचं वय २२ वर्ष असून तो सिक्योरिटीमध्ये काम करतो. त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. बाकी ५१ जणांना काही तासांच्या निरिक्षणानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. सरकारने प्रत्येक सेंटरवर एक AEFI सेंटर बनवले आहेत, जिथे लस दिल्यानंतर काही समस्या आल्यास, चेकअपची सुविधा मिळते. काही लोकांना वॅक्सिनच्या किरकोळ समस्या दिसल्या असल्या तरी, ही सौम्य लक्षण असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. लसीकरणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी लशीबाबत बोलताना सांगितलं की, आपले वैज्ञानिक आणि विशेषज्ञ ज्यावेळी दोन्ही मेड इन इंडिया वॅक्सिन सुरक्षित आणि प्रभावी असल्याबाबत आश्वस्त झाले, त्यावेळीच या वॅक्सिनला परवानगी देण्यात आली.
राजधानी दिल्लीत शनिवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी पुरळ उमटणे, सूज येणे किंवा ताप येणे यासारखी किरकोळ लक्षणे दिसण्याची एकूण ५१ प्रकरणे आढळली. दिल्लीत निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त ५३ टक्के लोकांनी कोविड-१९ची लस टोचून घेतली. ‘थांबा आणि वाट पाहा’ भूमिका, संवादाचा अभाव आणि को-विन अॅपमधील त्रुटी ही त्याची कारणे असल्याचे तज्ज्ञांनी रविवारी सांगितले. दिल्लीत नोंदणी झालेल्यांपैकी ५३.३ टक्के, म्हणजे ४३१९ आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी लस देण्यात आली. राजीव गांधी विशेषोपचार रुग्णालयात ४५ जणांना लस देण्यात आली. ‘एम्स’मधील एका सुरक्षारक्षकाला करोनाच्या लशीचा डोज घेतल्यानंतर अॅलर्जिक रिअॅक्शन झाली. त्याला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.