मुंबई (वृत्तसंस्था) पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानसा येथे सिद्धूवर गोळी झाडण्यात आली असून या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिद्धू मूसेवाला गेल्या महिन्यात प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा त्यांनी Scapegoat या नवीन गाण्याद्वारे पंजाब सरकारला ‘देशद्रोही’ म्हटले होते. या गाण्यातून सिद्धू मुसेवालाने आपली नाराजी दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
सिद्धू मुसेवाला यांचं काय आहे मूळ नाव, अभियंता होण्याचं होतं स्वप्न
सिद्धू मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. त्यांचे बालपणीचे नाव शुभदीप सिंग सिद्धू होते. सिद्धू मुसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाडी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. सिद्धू मुसेवाला यांना अभियंता व्हायचे होते आणि याच इच्छेपोटी त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगची पदवी मिळवली होती. पण मनात संगीताची आवड पहिल्यापासूनच होती.
कॉलेजमध्ये संगीत शिकले, गाण्यावरून खूप वाद झाले
सिद्धू मुसेवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन काळात संगीत शिकलं आणि नंतर ते कॅनडाला गेले. सिद्धू मुसेवाला यांची गणना पंजाबमधील सर्वात वादग्रस्त गायकांमध्ये केली जाते. आपल्या गाण्यांमधून त्यांनी खुलेआम बंदूक आणि गुंड संस्कृतीचा प्रचार केला. ‘स्केपगोट’ व्यतिरिक्त, सिद्धू मुसेवालाच्या ‘संजू’ गाण्यावरही बराच गदारोळ झाला होता. एके-४७ गोळीबार प्रकरणात सिद्धू मूसवाला यांना जामीन मिळाल्यानंतर हे गाणे त्यांनी रिलीज केलं होतं. या गाण्यात सिद्धू मुसेवाला यांनी स्वत:ची तुलना अभिनेता संजय दत्तसोबत केली होती.
गीतकार म्हणून करिअरला सुरुवात केली
सिद्धू मुसेवाला यांनी आपल्या करिअरची सुरुवात गीतकार म्हणून केली होती. लायसन्स या गाण्याचे बोल त्यांनी लिहिले. सिद्धू मुसेवालाला त्याच्या सो हाय या गाण्यासाठी सर्वाधिक चर्चा मिळाली. २०१८ मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम PBX 1 रिलीज केला होता.