नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार,राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची बैठक सुरू असून या बैठकीत राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरल्याने त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक सुरू आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच ही बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेसमधील संघटनात्मक बदल करण्याची मागणी करणाऱ्या २३ नेत्यांसह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, भूपिंदरसिंग हुड्डा, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, हरीश रावत यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत बिहार निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा करतानाच पश्चिम बंगाल आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याची मागणी अनेक वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. पक्षातील नेत्यांची ही मागणी सोनिया गांधी यांनी गंभीरपणे घेतली असून त्यांनीही राहुल यांच्याकडे पक्षाची धुरा देण्याचे जवळपास निश्चित केल्याचं बोललं जात आहे.