मुंबई (वृत्तसंस्था) ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील इस्पितळात दाखल करण्यात आलं. आज दुपारी १२.३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. किशोर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला. ते नाटकांमध्ये स्त्री भूमिका करत असत. किशोर यांनी १९६०-६१ च्या सुमारास ‘आमराई’ या नाटकात काम केलं. हेच त्यांचं पहिलं नाटक ठरलं. त्यानंतर त्यांनी ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा नाटकांमधून काम केलं. १९८० च्या सुमारास ते दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ अशा कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले होते.