जळगाव (प्रतिनिधी) नेहरू नगरातील वृध्दाचे घरातून चांदीचे दागिने असा एकुण ३५ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी १७ सप्टेंबर रोजी पहाटे साडेसहा वाजता समोर आली आहे. याबाबत गुरूवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहरू नगरात ७० वर्षीय वृध्द पदमसिंग रामलाल राजपूत हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी मध्यरात्री दीड ते पहाटे साडे सहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घराच्या मेन गेटला बाहेरून कडी लावून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी थेट वरच्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या मुलीच्या बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले ३५ हजार रूपये किंमतीचे चांदी दागिने चोरून नेले.
चोरट्यांनी मोठ्या चलाखीने घरातील चांदीचे व अन्य मौल्यवान दागिने लंपास केले आहेत. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये लहान मुलांच्या हातातील चांदीचे कडे, तीन चांदीचे जोड, क्रिस्टलचे मोकळे साडे आणि पायातील चांदीचे पैंजण यांचा समावेश आहे. दरम्यान घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरूवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तपास पोउनि चंद्रकांत धनके हे करीत आहे.
















