जळगाव (प्रतिनिधी) केळीने समृध्द असलेला आणि मंत्रालयात तीन ‘वजनदार’ कॅबीनेट मंत्री असतांना जिल्ह्यात तब्बल १५० गावांमध्ये नदी काठावर तर कुठे उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. या गावांमध्ये स्मशानभूमीच नसल्याने मात्र पावसाळा, उन्हाळ्यात या गावातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मृत्यूनंतरच्या प्रवासात देखील यातनाच सहन कराव्या लागत असल्याचे चित्र सध्या आहे. ज्या गावांना स्मशानभुमिच नाही अशा ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केले असले तरी यासाठी निधीची चणचण असल्याने हे प्रस्ताव पडून आहे.
जिल्ह्याभरातील १५० ग्रामपंचायतींनी स्मशानभूमीच्या बांधकामांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला प्रस्ताव दिले आहेत. त्यासाठी स्मशानभूमीसाठी १० लाखांचा निधी देण्याची तरतुद आहे. यासाठी किमान १५ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. डीपीडीसीकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला असुन किमान या कामांसाठी तरी शासनाकडून अतिरीक्त निधी मिळावा अशी अपेक्षा होत आहे.
अनेक गावांचे प्रस्ताव येणे बाकी
स्मशानभूमी नसलेल्या गावांमध्ये मृतदेहावर अंत्यविधीची समस्या मोठी आहे. पावसाळ्याच्या दिवसात भर पावसात मृतेदहावर शेडअभावी अंत्यविधी आटोपण्याची वेळ येते. ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतींकडे कैफियत मांडल्याने जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव आले आहेत. मात्र अजनही अनेक गावांचे स्मशानभूमीचे प्रस्ताव आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमी नसलेल्या गावांची संख्या २०० हून अधिक आहे. जामनेर तालुक्यात सर्वाधिक ३० गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
ग्रामपंचायत विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
ग्रामपंचायत विभागाच्या जनसुविधा, नागरी सुविधा व तिर्थक्षेत्र विकासाचा निधी शासनाला परत जाण्याची नामुश्की जि.प. वर येणार आहे. मात्र अनेक वर्षापासून ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव येऊनही स्मशानभूमीसारखे विषय वर्षानुवर्षापासून प्रलंबित राहत असल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन २०२१-२२ चीही ग्रामपंचायत विभागास देण्यात आलेल्या निधीची कामे आजही पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायत विभागाच्या कामकाजाची कासव गती पाहायला मिळत आहे.
स्मशानभूमी नसलेली गावे
तालुका संख्या
जामनेर ३०
चोपडा १३
भुसावळ ०१
यावल ०३
बोदवड ०१
चाळीसगाव ०६
अमळनेर २२
रावेर ०९
भडगाव १३
पारोळा ११
जळगाव ०४
पाचोरा ११
मुक्ताईनगर १३
धरणगाव ०७
एरंडोल ०५