ओरोसे (वृत्तसंस्था) सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडी कडून जागा वाटपाची घोषणा करण्यात आली. यात शिवसेनेला आठ, राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी पाच तर अपक्ष उमेदवाराला एक असा जागावाटपाचा फार्मुला ठरविण्यात आला. मात्र सावंतवाडी तालुका मतदारसंघाची शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागेवर अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही.
विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व सुशांत नाईक यांचे मतदारसंघ अद्याप निश्चित नाहीत. याबाबत मागाहून माहिती दिली जाईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली. जिल्हा बँकेचा २०१५ ते २०२१ या कालावधीतील कार्यअहवाल सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये प्रकाशित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत म्हणाले, सतीश सावंत यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा बँक निवडणूक लढवत आहोत. सतीश सावंत कोण, असे २०१९ मध्ये विचारणारे लोक आता घाबरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे सतीश सावंत यांची बदनामी सुरू आली आहे.”
यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकेल. (कै.) शिवरामभाऊ जाधव यांचा वारसा सतीश सावंत चालवत आहेत. ते कुठेही इकडे-तिकडे जाणार नाहीत. विरोधक त्यांच्यात व शिवसेनेत वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु तसे काही होणार नाही. आमचे सर्व उमेदवार तगडे व सहकाराची जाण असलेले आहेत. सावंतवाडी मतदारसंघ उमेदवारी जाहीर न करण्यामागे विशेष कारण नसल्याचेही सामंत म्हणाले.
















