नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचं कोविड-१९ मुळे निधन झालं. ते ३४ वर्षांचे होते. स्वत: सीताराम येचुरी यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.
“मी अत्यंत दुःखाने कळवू इच्छितो, की माझा मोठा मुलगा आशिष येचुरी याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. आशिषवरील उपचारादरम्यान आमच्या मनात आशेचा किरण जागवणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो. डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्या पाठीशी उभे राहिलेले असंख्य जण” अशा आशयाचे ट्वीट सीताराम येचुरी यांनी केले आहे.
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात गुरुवारी पहाटे सहा वाजता आशिष येचुरी यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना संसर्गानंतर दोन आठवड्यांपूर्वी आशिष येचुरींना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.
कोण होते आशिष येचुरी?
३४ वर्षीय आशिष येचुरी हे व्यवसायाने पत्रकार होते. राजधानी दिल्लीतील एका आघाडीच्या वर्तमानपत्रात ते सिनिअर कॉपी एडिटर म्हणून कार्यरत होते.
कोण आहेत सीताराम येचुरी?
६८ वर्षीय सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव आहेत. जुलै २००५ मध्ये पश्चिम बंगालमधून त्यांची राज्यसभेवर खासदारपदी वर्णी लागली होती. सीताराम येचुरी यांचा विवाह बीबीसी हिंदीच्या माजी दिल्ली संपादक सीमा चिश्ती यांच्याशी झाला आहे. हा त्यांचा दुसरा विवाह आहे. आशिष हे त्यांच्या पहिल्या पत्नीपासूनचे पुत्र होते. त्यांना एक मुलगीही (अखिला येचुरी) असून ती युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबराला शिकवते.