जळगाव (प्रतिनिधी) सोलरची ऑनलाईन प्रकरणे सबमीट केल्यानंतर रिलीज ऑर्डर काढण्यासाठी २९ हजारांची लाच स्विकारणाऱ्या पाचोरा येथील महावितरण विभागाचे सहा. अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८, रा. संभाजी चौक) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवार दि. १२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचा सोलर फिटिंगचा व्यवसाय असून त्यांनी तीन प्रकरणे तयार करुन ते ऑनलाईन सबमीट केले होते. त्या प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्याकरीता ३ हजार रुपयांप्रमाणे एकूण ९ हजार व यापुर्वीच्या २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिली आहे. त्याकरीता पैशांची मागणी महावितरणचे सहा. अभियंता मनोज मोरे यांनी केली होती. याबाबतची तक्रार दि. ११ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तीन प्रकरणांचे रेग्युलर प्रमाणे ९ हजार व यापूर्वीच्या २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे त्याचे तुम्ही वन टाइम पेमेंट करत आहात म्हणून २५०० प्रमाणे ७० हजार रुपये होतात.
सापळा रचून बसलेल्या पथकाने रंगेहाथ पकडले
लाचेच्या रकमेचे तक्रारदार यांनी ३० हजार दिले असून उर्वरीत रक्कम ४० हजार पैकी पहिल्या हप्त्याचे आज २० हजार व चालूच्या ३ प्रकरणांचे ९ हजार अशी एकूण २९ हजार रुपयांची मागणी करीत ती रक्कम स्विकारतांना सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहा. अभियंता मोरे यांना रंगेहाथ पकडले.
या पथकाची कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोकॉ राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर, सुरेश पाटील यांच्या पथकाने केली.