धरणगाव (प्रतिनिधी) : भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय स्मार्ट गर्ल्स कार्यशाळेचा समारोप रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री दिगंबर जैन मंदिर येथे झाला. या कार्यशाळेत १३ ते १९ वयोगटातील तब्बल २७ मुलींनी सहभाग घेतला.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाचे सचिव डॉ. मिलिंद दहाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून बीजेएसचे विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत डागा उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षक नितीन पोहरे, जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, जिल्हा सचिव दर्शन देशलहरा, श्री जैन संघ अध्यक्ष सुमित संचेती, दिगंबर समाज अध्यक्ष राहुल जैन, प्रतिक जैन, मूर्तिपूजक संघ सदस्य सुशील कोठारी, बीजेएस धरणगाव अध्यक्ष निलेश ओस्तवाल, उपाध्यक्ष आकाश कुमट, सचिव मयूर चोपडा, एरंडोल अध्यक्ष सागरमल ओस्तवाल, वरिष्ठ पत्रकार कडु आप्पा महाजन, प्रविण कुमट, आलोक कुमट आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रा. चंद्रकांत डागा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्मार्ट गर्ल्स हा उपक्रम संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या सखोल अभ्यासाचा परिणाम असून मुलींची स्व-ओळख, विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची ताकद, नातेसंबंधातील संवेदनशीलता, समाजाप्रती जागरुकता व नैतिक मूल्ये विकसित करण्याचे उद्दिष्ट या कार्यशाळेत साधले जाते. याशिवाय संघटनेचे फाऊंडेशन प्रोग्राम, परिणय पथ, दिल का जश्न, अल्पसंख्याक व एमएसएमई आदी उपक्रमांबद्दलही माहिती दिली.
प्रशिक्षक नितीन पोहरे यांनी सांगितले की, स्मार्ट गर्ल्स हा शांतीलाल मुथा यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. “मुली आनंदी, आत्मविश्वासी आणि सुरक्षित राहाव्यात यासाठी हा उपक्रम राबवला जातो. यात एकूण ८ सत्रे असतात, तर शेवटच्या सत्रात मुलींच्या पालकांनाही सहभागी करून घेतले जाते,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी निर्मल बोरा, निलेश ओस्तवाल आणि कडु आप्पा महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मिलिंद दहाडे म्हणाले, “शांतीलाल मुथा यांचे व्हिजन खूप मोठे आहे. किल्लारी भूकंपातील १२०० विद्यार्थ्यांचे पुनर्वसन त्यांनी पुण्यात केले. तेथे शिकलेला एक विद्यार्थी नंतर माझ्या महाविद्यालयात फिजिकल डायरेक्टर पदासाठी मुलाखतीला आला होता व सध्या तो शिरपूर कॉलेजमध्ये कार्यरत आहे. समाजासाठी असे कार्य करणाऱ्या संघटनेला मी सॅल्यूट करतो.” तसेच, संघटनेने इंग्लिश मीडियम शाळाही सुरू कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गितेश ओस्तवाल यांनी केले तर पंकज दुगड यांनी आभार प्रदर्शन केले.