चोपडा (प्रतिनिधी) शहरातील श्रीमती शरदचंद्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमधील असिस्टंट अकाऊटंटने सन २०१४ ते सन २०२२ या काळात तब्बल ५० लाख ६७ हजार ८९३ रुपयाचा अपहार करुन संस्थेची फसवणुक केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात विजय नारायण बोरसे वय ५३ धंदा नोकरी रा. प्लॉ.नं.४१,४२ परीस पार्क चोपडा ता. चोपडा) यांनी फिर्याद दिली आहे. विजय बोरसे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्रीमती शरदचंद्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन कॉलेज चोपडा या ठिकाणी असिस्टंट अकाऊटंट म्हणून काम करणारे समाधान दत्तात्रय पाटील याने सन २०१४ ते सन २०२२ पावेतो संस्थेत विद्यार्थाची संपूर्ण माहिती असलेला डाटा, त्यांच्याकडून घेतलेली फी याची माहिती ठेवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रुध्दी सॉफ्टवेअरमध्ये स्वतःच्या नावाचा एस.डी.पी. युजर्स आय.डी- पासवर्ड तसेच सुभाष यादवराव पाटील, पी.ए. देशमुख आणि संजय नरेंद्र कुलकर्णी यांच्या एस.एन. के युजर आय.डी- पासवर्डचा वापर करुन एकुण ३४३ विद्यार्थांकडुन फी म्हणून पैसे घेवुन त्यांना स्वाक्षरी करुन पैसे घेतल्याची पावती दिली. परंतू त्याची कैश बुकमध्ये नोंद न करता एकुण ५० लाख ६७ हजार ८९३ रुपयाचा अपहार करुन संस्थेची फसवणुक केली. याप्रकरणी समाधान पाटील यांच्याविरुद्ध भादवि कलम ४०८,४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण हे करीत आहेत.
















