चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील देवळी -चिंचखेडे शिवारात ५५ वर्षीय शेतकऱ्याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात हत्याराने वार करून व गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासात खुनाचा उलगडा केला असून हा खून दोन्ही सख्या मुलांनीच केल्याचे उघड झाले आहे. वडील हे आई व दोन्ही मुलांकडून दररोज शेतीची कामे करून घ्यायचे पण घरखर्च, कपडे आणि औषधोपचारासाठी पैसे देत नव्हते. तसेच वारंवार शिवीगाळ करायचे. त्यामुळेच त्यामुळेच खून केल्याची कबुली दोघा भावांना दिली. पोलिसांनी दोघा भावांना अटक केली असून मुकेश राजेंद्र पाटील (२३) व राकेश राजेंद्र पाटील (२१) अशी खून करणाऱ्या मुलांची नावे आहेत.
जबाबावमध्ये विसंगती व संशयास्पद हालचालींवरून घेतले ताब्यात !
राजेंद्र सुखदेव पाटील (५० रा. देवळी ता.चाळीसगाव) हे बुधवारी रात्री शेतात झोपण्यासाठी गेले होते. राजेंद्र यांची अज्ञात इसमांनी हत्या केल्याचे समोर आले होते. परंतू पोलिसांना घटनास्थळी रक्ताने माखलेल्या लाकडी काठ्या, दोरी, तसेच कांदा चाळीचे तुटलेले कुलूप व तेथील कपाशीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या गोण्या यांचे बारकाईने निरीक्षण केले असता खुनाचा बनाव केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी गावात चौकशी केली असता, मृत शेतकरी आणि त्याच्या मुलांमध्ये वाद असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी मयताच्या मुलांकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्या जबाबावमध्ये आढळून आलेली विसंगती व संशयास्पद हालचालींवरून थोरला मुलगा मुकेश (वय २३) व लहान मुलगा राकेश यांना ताब्यात घेतले.
घरखर्चाला पैसे देत नव्हते म्हणून केला खून !
पोलिसांनी मुलांची कसून चौकशी केली असता आपणच वडीलांचा खून केल्याची कबुली दिली. वडिल आई व आम्हाकडून शेतामध्ये काबाडकष्ट करून घेत होते. मात्र आम्हाला घरखर्चाला पैसे देत नव्हते. तसेच आईला व शिवीगाळ करून मारहाण करत असत. दि. ८ रोजी पहाटे ३.२ सुमारास मुकेश व राकेश हे दोन्ही दुचाकीने शेतात गेले, व वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारून नंतर दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. तसेच कापूस चोरण्यासाठी अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा बनाव करून घरी जावून झोपले, अशी माहिती त्यांनी दिली.
या पथकाने केला गुन्हा उघड !
अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विष्णु आव्हाड, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे एएसआय मिलींद शिंदे, सुभाष पाटील, दिलीप सोनवणे, हवालदार योगेश मांडोळे, पोलिस कॉन्स्टेबल गोरख चकोर, कमलेश राजपूत, भूषण बाविस्कर, दिपक महाजन, निलेश लोहार, योगेश बोडके, प्रवीण पाटील, हनुमंत वाघेरे, जितेंद्र परदेशी, ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर बडगुजर, दिपक नरवाडे, शैलेश माळी, होमगार्ड महेंद्र पवार, एलसीबीचे एएसआय अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील यांच्या पथकाने उघडकीस आणला.