मुंबई (वृत्तसंस्था) काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतरही श्रीनगरमध्ये काही तरुणांना झेंडा फडकावण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, श्रीनगर, काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असल्याचे आपण नेहमीच सांगतो. ३७० कलम आता हटवण्यात आले आहे. तरीसुद्धा आम्ही आमच्या लोकांना तिकडे तिरंगा फडकावण्यापासून रोखत असू, तर काश्मीरमध्ये काय बदल झाला आहे हा लोकांच्या मनात प्रश्न आहे.
तसेच, जर काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज फडकवताना कोणी विरोध करुन गोंधळ घालत असेल, तिरंगा फडकविण्यासाठी मनाई करत असेल, तर तो देशद्रोह असल्याचे मी मान्य करतो, असेही राऊत यांनी म्हंटले आहे. या देशात समान नागरी कायदा लागू व्हायला हवा. सरकारने अशा प्रकारचा कोणता कायदा आणल्यास आम्ही निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले आहे.
चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लादण्याचा प्रयत्न मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला यांच्याकडून होत असेल, तर केंद्र सरकारने या नेत्यांवर कडक कारवाई करायला हवी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.