मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याबाबत आधीपासूनच माहिती होती असे अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यामधील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. तर आता अर्णब गोस्वामी यांचे कोर्ट मार्शल करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
संजय राऊत यांनी बोलताना म्हटलं की, “अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमधून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचं आधीच माहिती होतं हे दिसून येतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे त्यांचं कोर्ट मार्शल झालं पाहिजे”. संजय राऊत यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपा नेत्यांनी यावर भाष्य करण्याची मागणीदेखील केली आहे. त्यांनी आपली मतं सांगून आमच्या ज्ञानात भर टाकावी असा टोला त्यांनी लगावला आहे. “भाजपा नेते सर्वच पक्षांबद्दल बोलत असतात. अर्णब गोस्वामी यांच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. देशाच्या सुरक्षेची माहिती बाहेर येणं राष्ट्रीय सुरक्षेसाठी धक्का आहे. अर्णब गोस्वामी राष्ट्रीय सल्लागार असल्याप्रमाणेच बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भूमिका मांडली पाहिजे. इतर भाजपा नेत्यांनीही यावर भूमिका मांडत देशाच्या आणि राज्याच्या ज्ञानात भर पाडावी,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देशावर पुलवामा हल्ला होणार आहे हे आधीच अर्णब गोस्वामींना माहित होत, याचा अर्थ लष्कराची गुपितं सुरक्षित नसल्याचं सांगत ही गुपितं बाहेर येतातच कशी असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रीय गुपितं, लष्कराची गुपितं जर बाहेर येत असतील तर तो देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या प्रकरणी देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी आपली भूमिका मांडावी अशीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
















