नाशिक (वृत्तसंस्था) सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीत. त्यामुळे यूपीएचं नेतृत्व करण्यासाठी शरद पवार हे सक्षम व्यक्तिमत्व असल्याचं राऊत म्हणाले. राऊत हे आज नाशिकमध्ये होते. राऊत यांनी आज नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. तसंच सचिन वाझे प्रकरणावर बोलताना कुणीही आलं आणि कोणत्याही प्रकरणाचा तपास केला तर सत्य समोर येईलच, असंही राऊत यांनी म्हटलंय.
देशात भाजपाप्रणीत एनडीएसमोर काँग्रेसप्रणीत युपीए प्रमुख विरोधकाची भूमिका निभावत आहेत. मात्र, आता युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. नाशिक महानगर पालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच, सोनिया गांधी यांनी आत्तापर्यंत युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने निभावली असल्याचं देखील राऊत म्हणाले आहेत.
“देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं राऊत म्हणाले आहेत. “आत्तापर्यंत सोनिया गांधींनी हे नेतृत्त्व उत्तम पणे केलं आहे. पण युपीएची ताकद सध्या कमी झाली आहे. सोनिया गांधींची प्रकृती बरी नसते. त्या आता सक्रिय राजकारणात फार दिसत नाहीत. देशात सध्या अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीत, पण त्यांना भाजपविरोधात उभं राहण्याची इच्छा आहे. या पक्षांना युपीएमध्ये आणण्यासाठी शरद पवार हेच नाव मला दिसतंय”, असं राऊत यावेळी म्हणाले.
जळगावमध्ये घोडेबाजार, मग पहाटेचा काय गाढवबाजार होता का?
दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी जळगाव पालिका निकालांवरून भाजपाने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. जळगाव पालिका निवडणुकीत शिवसेनेनं घोडेबाजार केला, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. त्यावर “घोडेबाजाराचा आरोप कुणी कुणावर करावा? भाजपानं याआधी घोडेबाजार केला नाही का? पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?”, असा उलट प्रश्न राऊतांनी केला आहे.
‘NIAला एवढ्या लवकर येण्याची गरज नव्हती’
संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरण आणि मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणांवर भाष्य केलं. एनआयएला एवढ्या लवकर येण्याची गरज नव्हती. एनआयएला जो तपास करायचा आहे तो करु द्या. मुंबईचे पालीस, माहाराष्ट्राचे एटीएस सक्षम आहे. मात्र, केंद्रात विरोधी सरकार आहे. विरोधी पक्षांची वेगळीच भूमिका आहे. त्यामुळे ते राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राज्यातील सरकारला काहीही फरक पडत नाही, असे राऊत म्हणाले.