मुंबई (वृत्तसंस्था) बॉलीवूड अभिनेत सोनू सूद याच्या घर आणि कार्यालयावर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर तब्बल २० तास सोनू सूदच्या घरी झाडाझडती सुरु होती. अखेर आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या.
एका प्राप्त अहवालानुसार, अकाउंट बुकमध्ये विसंगती असल्याचा आरोप झाल्यानंतर आयटी टीमने सोनू सूद आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित 6 ठिकाणी सर्वेक्षण केले. काही दिवसांपूर्वीच दिल्ली सरकारने सोनू सूदला शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसिडर बनवले आहे. या दरम्यान तो आम आदमी पक्षात सामील होण्याबाबतही बोलले जात होते, पण सोनू सूदने स्वतः सांगितले होते की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी राजकारणावर कोणतीही चर्चा झालेली नाही.
दरम्यान, कोरोना काळात गरिबांसाठी, गरजूंसाठी सोनूनं खूप मदत केली. काहीही अडचणी उभ्या राहिल्या की लोक सोनूकडे मदतीची मागणी करत होते. सोनूही त्यांच्या या अडचणी सोडवण्यास तात्काळ हजर राहायचा. लोकांनी तर त्याला देव मानत त्याचं मंदिर देखील बांधलं. अनेकांनी त्याच्या नावाचे पुतळे उभारले. आता या आयकर विभागाच्या छापेमारीत पुढे काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.