मुंबई (वृत्तसंस्था) दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे १०वी आणि १२वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार हे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा कधी?
इ. १० वीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत. परंतु या वर्षी कोविड-१९ परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने २१ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत सादर करण्यात यावेत. इ. १२ वीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि. २२ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत होतील.
कोविड १९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे १२ वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून ५ ते ६ प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल. कला/वाणिज्य/ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर १५ दिवसात Assignment सादर करावेत.
इ.१० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल.