जळगाव (प्रतिनिधी) मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार वितरण सोहळा डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृह येथे संपन्न झाला. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार ‘फुलटायमर’ या ग्रंथासाठी अण्णा सावंत (जालना) यांना तसेच नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मराठी रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यगिरीसाठी अजित दळवी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला.
दोघेही पुरस्कार प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील (अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आसाराम लोमटे (परभणी) हे उपस्थित होते. भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशनच्या वतीने जैन इरिगेशन सिस्टम लि. च्या मिडीया विभागाचे व्हाईस प्रेसिंटड अनिल जोशी उपस्थित होते. त्यांच्या समवेत मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाहक दादा गोविंदराव गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळूंखे, सहकार्यवाहक गणेश मोहिते व पदाधिकारी उपस्थित होती. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.
मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह, श्रीफळ, शाल, सूतीहार, 25 हजाराचा धनादेश व पुष्पगुच्छ देऊन 2025 चे दोन विशेष वाड्मय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रसिक आणि अभ्यासकांची या पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती होती.
आसाराम लोमटे यांनी ‘फुलटायमर’ ग्रंथावर व अजित दळवी यांच्या नाटकातील योगदाना विषयी भाष्य केले. यशवंत चव्हाण विशेष वाडमय पुरस्काराने सन्मानित ‘फुलटायमर’ हा ग्रंथ अण्णा सावंत यांचे आत्मकथन नसून चळवळींचा ऐवज सांगतो. नितळ वाचनीय पुस्तक वर्गीय भान देते. समाजावर आलेली अवकळा आणि समाजावर मूल्य व्यवस्थेवर पाणी ओतणे यावर अजित दळवींचे नाट्य भाष्य करते.सध्या स्थितीत विचारप्रधान नाटकांचा प्रवाह लुप्त झाला आहे. इतिहासाचा विपर्यास करून हवे ते मांडण्याचा आजचा काळ पाहताना गांधी विरुद्ध गांधी सारखे अभ्यासपूर्ण नाटक लिहणारे दळवी म्हणून वेगळे ठरतात. असे आसाराम लोमटे म्हणाले.
‘फक्त आर्थिक लढे करून भागणार नाही. भांडवली व मनुवादी संस्कृतीच्या गुलामीतून मुक्त होता आले पाहिजे. तेव्हा या गुलामीतून शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना बाहेर काढायचे असेल तर सांस्कृतिक, सामाजिक संघर्ष करावा लागेल.’ कामगार चळवळींचा आर्थिक इतिहास लिहला गेला आता सामाजिक व सांस्कृतिक अंगाने इतिहास लिहण्याची गरज आहे. कामगार क्रांती करतो मात्र ते जातीधर्मात विखुरले गेले त्यामुळे त्यांना खरा शत्रू समजत नाही.
असे कॉ. अण्णा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. ‘फुलटायमर’ विषयी सांगताना ते म्हणाले, गेल्या ७०-७५ वर्षांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, जातीय अस्मितांचा टोकदार होत गेलेला इतिहासच त्यात वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडला आहे. समाजात झालेले परिवर्तन, माणसाच्या बदललेल्या वृत्ती-प्रवृत्ती, समाजाच्या संघर्षाच्या मर्यादा, क्रांतीची स्वप्ने आणि त्याभोवतीचा परीघ, जात-धर्मजाणिवेने न आलेले वर्गभान, चळवळींचा नित्य होणारा संकोच यांसह समाजाचे प्रखर वास्तव हे ‘फुलटायमर’ आत्मकथनाचे विशेष असल्याचे ते म्हणाले.
नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्काराने सन्मानित यांनी प्रा. अजित दळवी यांनी एक मराठी नाटककार व पटकथालेखक असा प्रवास सांगितला. ‘मीराबाई, काय द्यायचं बोला..’, ’तुकाराम..’, ’आजचा दिवस माझा..’ आणि ’दुसरी गोष्ट..’ या चित्रपटांची कथेविषयी तसेच ’दुसरी गोष्ट’ ‘गांधी विरुद्ध गांधी..’, ‘शतखंड..’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा..’ ह्या नाटकांविषयी मनोगत व्यक्त केले. आजच्या परिस्थिती वर बोलणे कठिण आहे मात्र काही नवीन लेखक आजची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे याचा आनंद असल्याचे दळवी म्हणाले. डॉ. विष्णू सुरासे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिलीप बिरुटे यांनी परिचय व प्रास्ताविक केले.