मुक्ताईनगर (प्रतिनिधी) फक्त घोषणा करुन आणि भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेती पिकांसह जमिनीचंही नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. या मुद्द्यावरुन खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. फक्त घोषणा करुन आणि भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. मात्र, खूप कमी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत. सरकारनं शेतकऱ्यांकडे पूर्ण दूर्लक्ष केल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केला आहे. मी सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहे असं सांगतानाच शेतकऱ्यांकडे लक्षं द्या, अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारकडे केलीय.