जळगाव प्रतिनिधी । बेरोजगारीच्या समस्येमुळे युवकांसह त्यांचे पालकवर्ग देखील चिंतेत असून हा प्रश्न जटील बनला आहे. परिणामी युवक कॉंग्रेसतर्फे राज्यभर सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशाने जळगावात युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
देशात तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर हा सर्वाधिक म्हणजे १३ ते २७ टक्क्यांवर पोहोचला होता. यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे १२ ते १३ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. तेवढ्याच कुटुंबांचे जगणे रोजगाराविना मुश्किल झाले आहे. केंद्राच्या लहरी व चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून जीडीपीचा दरगेल्या तिमाहीत शून्याखाली घसरून-२३.९ टक्क्यांनी गेला असल्याचे प्रा.हितेश पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी प्रा. हितेश पाटील, प्रदेश महासचिव मुक्तदिर देशमुख, प्रदेश सचिव योगेश महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गोसावी, भुसावळ विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, जळगाव विधानसभा अध्यक्ष मुजीब पटेल, गजेंद्र साळुंखे, कुणाल पाटील, महेश पाटील, सईद तेली, गौरव पाटील, घनश्याम महाजन, पवन पाटील तसेच युवक कॉंग्रेस चे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.