जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी जळगाव जिल्ह्यास २५ हजार लसींचा साठा प्राप्त झाला असून सोमवार पासून पुन्हा लसीकरण सुरू करण्याचे निर्देश प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे यांना दिले असल्याची माहिती आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांची देखील उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी कोविडच्या प्रतिकारासाठी आरोग्य केंद्रात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना आढावा घेतला. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे येथे पुरेपूर पालन होते की नाही ? याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. तर रूग्ण आणि त्यांच्या आप्तांकडून समस्या जाणून घेत संबंधीतांना याबाबत जाब विचारत त्यांचे निराकरण केले. याप्रसंगी डॉ. सतीश पाटील यांनी आरोग्य केंद्रासह मतदारसंघातील विविध समस्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या. याचे तातडीने निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
दरम्यान, जळगाव जिल्हा प्रशासन हे कोरोनाच्या प्रतिकारासाठी अहोरात्र परिश्रम करत असून याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसू लागल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते म्हणाले की, आता कोरोना बाधीतांपेक्षा बरे होणार्यांची संख्या ही जास्त असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. तर बाधीतांची संख्या देखील आधीपेक्षा तुलनेत थोडी कमी आढळून येत आहे. असे ना. पाटील यांनी सांगितले.
तर जिल्ह्यात कोरोनाच्या लसीचा तुटवडा असल्याने आपण आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी २५ हजार लसींचा साठा प्राप्त झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधांचे जनतेने पालन करण्याचे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केले.