जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी नगरकडून जळगावकडे येणाऱ्या वाहनांवर गाडेगावजवळील सुप्रिम पाईप कंपनीजवळ अर्धनग्न टोळक्याने अंडीसह दगडफेक केली. यामध्ये वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले. ही घटना दि. २० रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. वाहनांवर अचानक हल्ला झाल्यामुळे प्रवशांसह तेथून प्रवास करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील तांबापूरा परिसरातील मतीन पटेल, खलील पटेल, जाहिद शहा, आसिफ पटेल आणि आरिफ खान हे छत्रपती संभाजी नगरकडून जळगावकडे येत होते. त्यांचे वाहन गाडेगाजवळील सुप्रिम कंपनीजवळ आले असता, त्यांच्यासह इतर वाहनांवर अर्धनग्न असलेल्या टोळक्याने महामार्गावरुन येणारी वाहने अडवली, त्यानंतर त्यांनी अचानक वाहनांवर अंडीसह दगडफेक केली. अचानक झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या दगडफेकीच्या घटनेत वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहनांमध्ये महिलांसह लहान मुल प्रवास करीत असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
११२ वर मिळाली तात्काळ मदत
अचानक झालेल्या दगडफेकीमुळे घाबरलेल्यांनी ११२ या पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस व नेरी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घाबरलेल्या वाहन चालकांनी आपली वाहने घेवून ते जळगावच्या दिशेने येवून त्यांनी वाहने एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली.
















