नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची आकडेवारी काहीशी कमी होताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सिंगापूरची हवाई वाहतूक तात्काळ थांबवण्याचं आवाहन केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केलं आहे.
सिंगापूरमध्ये कोरोनाचा असा स्ट्रेन आढळून आला आहे, ज्यामुळे लहान मुलांना अधिक संसर्ग होतो आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन लहान मुलांसाठी खूपच धोकादायक असून तिसऱ्या लाटेच्या स्वरूपात तो भारतात येऊ शकतो, असं मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. त्यामुळे सिंगापूर-भारत विमानसेवा थांबवावी असं आवाहन त्यांनी मोदी सरकारला केलं आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.
ट्वीटमध्ये सीएम केजरीवाल म्हणाले, “सिंगापूरमध्ये आढळलेलं कोरोनाचं नवं रूप लहान मुलांसाठी खूपच भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. भारतात हा तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकतो. केंद्र सरकारला मी आवाहन करतो की त्यांनी सिंगापूरसोबतची विमानसेवा तात्काळ रद्द करावी आणि लहान मुलांच्या लशीला पर्याय काय असू शकतो, यावर प्राधान्याने काम व्हायला हवं”
गेल्या काही दिवसांपासून सिंगापूरमध्ये कोरोनाच्या आकडेवारीत वेगाने वाढ होते आहे. या पार्श्वभूमीवर १४ मे रोजी सिंगापूरमध्ये लोकांना एकत्र येणे आणि तसेच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने इतर गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत.