मुंबई (वृत्तसंस्था) रिलायन्सच्या शेअरमधील घसरण आणि कोरोना रुग्णांचा वाढता आकडा यामुळे आज सकाळी बाजारात तुफान विक्री सुरु झाली होती. दुपारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४८५ अंकांनी घसरला असून तो ४०१९९ अंकावर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३४ अंकांनी घसरून ११७९५ अंकावर ट्रेड करत आहे.
आजच्या पडझडीत रिलायन्सच्या शेअरला तडाखा मिळाला आहे. फ्युचर रिटेल खरेदी करण्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मनसुब्यांना सिंगापूरमधील लवादाने जोरदार धक्का दिल्यामुळे या व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहे. अमेझॉनने रिलायन्स रिटेलच्या विरोधात लवादाकडे धाव घेतली होती. यामुळे रिलायन्सचा शेअर २ टक्क्यांनी घसरला आहे. ऑटो समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांनी शुक्रवारी उच्चांकी स्थिती गाठली. फार्मा वगळता सर्व विभागातील निर्देशांक सकारात्मक स्थितीत बंद झाले. निफ्टीने ३३.९० अंकांची वृद्धी घेतली व तो ११९३०.३५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १२७.०१ अंकांनी वधारून ४०६८५.५० अंकांवर पोहोचला. जवळपास १०१९ शेअर्स घसरले, १६५६ शेअर्सनी नफा कमावला तर १४२ शेअर्स स्थिर राहिले. शुक्रवारच्या सत्रात मारूती सुझुकी ४.२६ टक्के, एमअँडएम ३.३० टक्के, टाटा स्टील ३.२७ टक्के, पॉवर ग्रिड २.९१ टक्के आणि बजाज ऑटो २.७९ टक्के हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. अल्ट्रा टेक सिमेंट २.४४ टक्के, एचसीएल टेक्नोलॉजी १.५९ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर १.५६ टक्के, श्री सिमेंट ०.४४ टक्के आणि गेल १.३५ टक्के हे निफ्टीतील सर्वाधिक घसरण नोंदवणारे शेअर ठरले आहे. फार्मा वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी ऑटो क्षेत्राच्या नेतृत्वात सकारात्मक व्यापार केल्यामुळे हा नफा जवळपास ३ टक्के आहे. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे ०.५९ टक्के आणि ०.७१ टक्क्याची वृद्धी केली.