मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात गृहमंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने बुधवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी केला होता. मात्र, अवघ्या १२ तासांमध्येच काही पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात आली आहे.
राज्याच्या गृह विभागाकडून एक परिपत्रक काढून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत माहिती देण्यात आली होती. बुधवारी हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. परंतु, अवघ्या 12 तासांतच या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. याच आदेशाला गृहविभागानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यांमधील गृहविभागाचा अजब कारभार समोर आला आहे. गृहविभागाच्या या कारभाराची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.
बुधवारी गृह विभागाकडून परिपत्रक काढून राज्यातील वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली होती. यात नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश होता. त्यांच्या जागी नाशिमध्ये जयंत नाईकनवरे कारभार सांभाळणार होते. तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचीही बदली झाली होती. त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली होती. बीडचे पोलीस अधिक्षक आर. राजा यांची पुण्यात बदली करण्यात आली होती. तसंच पुण्यातील मावळ गोळीबार प्रकरणामुळे वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या संदीप कर्णिक यांचं पुण्यात पुनरागमन झालं होतं. पुण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून त्यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला होता. इकडे मिलींद भारंबे यांना पदोन्नती देण्यात आली होती. भारंबे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार होते.