कोल्हापूर (वृत्तसंस्था) आपण सोनं, चांदी, पैसे आणि मौल्यवान चोरीच्या घटनांबद्दल ऐकलं असेलच, मात्र कोल्हापुरात काहीसा अजबच प्रकार घडला. काय म्हणावे या चोराला?. हा चोरटा महिलांच्या कपडे चोरी करायचा. कोल्हापूरमधील भुदरगड तालुक्यातील गारगोटीत ही अजब चोरीची घटना घडली. याप्रकरणी न्यायाधीशांनी चोरट्याला रंगेहाथ अटक केली आहे. सुशांत सदाशिव चव्हाण असे या चोराचे नाव आहे.
झालं असं की, गेल्या महिन्याभरात सकाळी आवारात वाळत टाकलेले कपडे अचानक गायब होत होते. हे कपडे अचानक गायब कसे होतात असा प्रश्न न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबीयांना पडला होता. पहिल्यांदा कपड्यांची चोरी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. त्यानंतर असाच प्रकार तीन ते चार वेळा घडला होता. न्यायाधीशांनी या संदर्भात भुदरगड पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या निवासस्थानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोर कंपाऊंडच्या भिंतीवरुन उडी मारुन आवारात वाळत घातलेल्या कपड्यांकडे जाताना दिसला. हे कपडे घेऊन चोराने पळ काढला.
सोमवारी पहाटेच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या दोन कर्मचाऱ्यांनी या आरोपीला पकडले असून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धक्कादायक माहिती आली समोर
एका वृत्तानुसार, तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर यांनी सांगितले की, “सुशांत सदाशिव चव्हाण असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील निवासी आहे. तो ३० वर्षीय आहे.” सुशांत चव्हाण याला काही मानसिक त्रास असल्याचे त्याच्या आईने पोलिसांना सांगितले. तो पहाटे उठायचा आणि कपडे चोरायचा. विशेषत: महिलांचे कपडे चोरी करुन तो स्वत: पेहराव करायचा आणि नंतर फेकून द्यायचा. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही वैद्यकीय तपासणी करणार आहोत असेही मयेकर यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर यांनी पुढे सांगितले की, संशयिताच्या आईने सांगितले की, तो लहान असताना त्याच्या डोक्यात कुणीतरी दगड मारला होता. लहानपणापासूनच तो विचित्र गोष्टी करतो. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, तो दररोज पहाचे ४ वाजता अचानक उठतो आणि नंतर काय करतो ते आठवत नाही.
















