भोपाळ (वृत्तसंस्था) येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याने नुकतीच एका चोरीच्या गुन्ह्यात कायमस्वरूपी वॉरंटी आरोपीला अटक केली आहे. हे प्रकरण 34 वर्षं जुनं असून चोराला अटक केली तेव्हा त्याचे वय 35 वर्षे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जेव्हा या आरोपीने गुन्हा केला तेव्हा तो फक्त 1 वर्षाचा होता. हे प्रकरण तापल्यानंतर आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच (Police) प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता ते फिरवा-फिरवीची उत्तरं देत आहेत. गुन्ह्याच्या वेळी आरोपी अल्पवयीन होता आणि त्यात त्याचं वय 46 वर्षं असल्याचं पोलीस सांगत आहेत. हा प्रकार रीवा जिल्ह्यातील सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन परिसरात घडला. 34 वर्षे जुन्या प्रकरणात पोलिसांनी उमाशंकर शर्मा नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. विशेष म्हणजे त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी एक प्रेस नोट जारी केली. त्यानुसार अटक करण्यात आलेला आरोपी कायमस्वरूपी वॉरंटी आहे, असं सांगण्यात आलं असून, त्याचं वय 35 वर्षे नोंदवण्यात आलं आहे. आरोपीने 34 वर्षांपूर्वी गुन्हा क्रमांक 461 मध्ये म्हणजेच चहाच्या टपरीत चोरी केल्याचं सांगण्यात आलं आहे.
2011 मध्ये न्यायालयाने या गुन्ह्यासाठी वॉरंट जारी केलं होतं. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर 34 वर्षांनी त्याला 11 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली. पोलिसांच्या प्रेस नोटनुसार, जेव्हा या आरोपीने गुन्हा केला तेव्हा तो फक्त 1 वर्षाचा होता, त्याला आता वयाच्या 35 व्या वर्षी अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत:च्या बचावासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता ते चोरीतील आरोपीचे वय 46 वर्षे सांगत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टपरीतील चहा आणि पान चोरणारा गुन्हेगार हा लहान मुलगा होता, त्याच्यावर 34 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता आणि आता तब्बल 34 वर्षांनंतर त्याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे गोंधळाचं वातावरण तयार झालंय. एक वर्षाचा मुलगा आरोपी होऊच कसा शकतो?, असा प्रश्न अनुत्तरीत आहे. शिवाय या प्रकरणानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अटकेवेळी ज्या आरोपीचं वय पोलिसांनी 35 वर्ष सांगितलं होतं, तेच पोलीस हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर आरोपीचं वय 46 असल्याचं सांगत आहेत. पोलिसांच्या या बेजबाबदार कारभारावर चांगलीच टीका होताना दिसत आहे.